४ वर्षापासून फरार आरोपीला बाजारपेठ पोलीसांकडून अटक

Spread the love

४ वर्षापासून फरार आरोपीला बाजारपेठ पोलीसांकडून अटक

योगेश पांडे वार्ताहर 

कल्याण – अंमली पदार्थांची तस्करी करणाऱा एक आरोपी गेल्या चार वर्षापासून फरार होता. कल्याणमधील बाजारपेठ पोलीस चार वर्षापासून या तस्कराच्या मागावर होते. अखेर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी सापळा रचून या तस्कराला अटक केली. सैफ सिकंदर बुरहान (३८) असे आरोपीचे नाव आहे. तो मेफेड्रोन (एम. डी.) या अंमली पदार्थांची तस्करी करायचा. चार वर्षापूर्वी या तस्करीप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी सैफ विरुध्द गुन्हा दाखल केला होता. त्याला याप्रकरणात अटक करण्यासाठी पोलिसांनी तयारी केली असतानाच, तो कल्याण शहर परिसरातून फरार झाला होता. पोलिस त्याचा चार वर्ष शोध घेत होते. मुंबई, ठाणे, रायगड परिसरात पोलिसांनी त्याचा शोध घेतला होता.

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन साळवी यांना अंमली पदार्थ तस्करीतील आरोपी सैफ बुरहान हा बैलबाजारातील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. तातडीने बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रुपवते, या पथकाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार सचीन साळवी, हवालदार प्रेमा बागुल, अरूण आंधळे यांच्या पथकाने बाजार समिती इमारत परिसरात सापळा लावला. ठरल्या वेळेत सैफ बाजार समिती आवार परिसरात येताच सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली. आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकलो आहोत, याची चाहूल लागताच त्याने पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. पण पोलसांनी त्याला जागीच जेरबंद केला. कल्याण परिसरातील अंमली पदार्थाची अनेक प्रकरणे सैफच्या अटकेने उलगडणार आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रूपवते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon