कंपनीच्या बाथरूममध्ये कपडे धुण्यास नकार दिल्याने सुरक्षारक्षकाची हत्या, पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे सापडला आरोपी
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – नवी मुंबईतील रबाळे येथे सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याप्रकरणी कंपनीच्या कर्मचाऱ्याला रबाळे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. परंतु, शवविच्छेदन अहवालात सुरक्षारक्षकाचा मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्या असता सत्य समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, नारायण मनवर – ५८ असे हत्या झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. नारायण यांचा मृतदेह शुक्रवारी कंपनीच्या आवारात आढळून आल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद करून नारायण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, शवविच्छेदनाच्या अहवालात नारायण यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली.
पोलिसांनी घटना घडलेल्या रबाळे एमआयडीसीमधील स्टील क्राफ्ट इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडे जाणाऱ्या रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेजमध्ये पोलिसांनी त्याच कंपनीतील कामगार मोहित शीतला होबे – २१ हा शुक्रवारी सुट्टीचा दिवस असतानाही संध्याकाळी ६ वाजता कंपनीकडे पायी जात असल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी मोहितला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सुरक्षारक्षकाची हत्या केल्याची कबूली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सुट्टी असल्याने कंपनी बंद होती. सुट्टी असल्याने मोहित कंपनीतील बाथरूममध्ये कपडे धुण्यासाठी गेला. पण कंपनीतील कोणत्याही वस्तूचे नुकसान किंवा चोरी मी बाबदार असेल, असे सांगत नारायणने मोहितला कंपनीत जाण्यास नकार दिला. यावर मोहित चिडला आणि त्याने नारायणला बांबूच्या काठीने मारहाण केली. या घटनेत नारायणचा मृत्यू झाला. आरोपीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.