अवैध मद्य विक्रेत्यांसोबत वाढदिवस साजरा करणं पोलीस उपनिरीक्षकास भोवलं; वरिष्ठांकडून कारवाईचा बडगा नियंत्रण कक्षात बदली
योगेश पांडे / वार्ताहर
नाशिक – वणी पोलीस स्थानकात उपनिरीक्षकाचा अवैध मद्य विक्रेत्यांनी साजरा केलेला वाढदिवस पोलीस उपनिरीक्षकाला चांगलाच भोवला आहे. या वाढदिवसाची वरिष्ठांनी दखल घेतल्याने पोलीस उपनिरीक्षकास नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार कोठावळे यांचा वाढदिवस दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात साजरा झाला. या वाढदिवसाला अवैध मद्य विक्री करणारे व पुरवठा करणारे हे देखील उपस्थित होते. यातील काही जणांवर मद्य विक्री तसेच तस्करीबाबत गुन्हे दाखल असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.
या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वरिष्ठांकडून या फोटोची दखल घेत पोलीस उपनिरीक्षक कोठावळे यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले. दरम्यान, वाढदिवस ही वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे पोलिसांनी आपला वाढदिवस पोलीस ठाण्यात सार्वजनिकरित्या साजरा न करता घरीच साजरा करावा, असा आदेश तात्कालिन नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी दिला होते.
या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत पोलीस ठाण्यातच पोलीस उपनिक्षकाचा वाढदिवस साजरा झाला. या वाढदिवसाला मद्य विक्रेते व पुरवठादार हजर राहिल्याने हा वाढदिवस पोलीस उपनिरीक्षकाला चांगलाच भोवला आहे. वाढदिवस साजरा करतानाचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने वरिष्ठांनी विजयकुमार कोठावळे यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना आता नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले आहे.