पुण्यात महिलेला भररस्त्यात क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण; पोलीसांनी आरोपी पती – पत्नीला केली अटक

Spread the love

पुण्यात महिलेला भररस्त्यात क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण; पोलीसांनी आरोपी पती – पत्नीला केली अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

पुणे – शिक्षण, संस्कृतीचे माहेर घर असल्याची ख्याती असलेल्या पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्ह्याची प्रकरणे वाढत आहेत. गुन्हे होण्याचे जे प्रकार आहेत, ते आणखी धक्कादायक म्हणावे असे आहेत. कल्याणीनगर परीसरात पोर्श वाहनाने दुचाकीला धडक देणे असेल किंवा गल्लीबोळात कोयता गँगचा झालेला सुळसुळाट असेल, पुण्यात आता सामान्य नागरिक सुरक्षित नाहीत, अशी भावना पुणेकर व्यक्त करत आहेत. शनिवारी बाणेर पाषाण रस्त्यावर एका डिजिटल कटेंट क्रिएटर महिलेला कारचालकाने जबर मारहाण केली. या मारहाणीनंतर सदर महिलेने रक्तबंबाळ अवस्थेत स्वतःचा व्हिडीओ तयार करून झाला प्रसंग सांगितला. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी आता ताब्यात घेतले आहे. २७ वर्षीय जेरीलन डिसिल्वा या त्यांच्या मुलांसह स्कुटीवरून बाणेर पाषाण मार्गावरून प्रवास करत होत्या. यावेळी एका चारचाकी वाहनाने ओव्हरटेक करण्यासाठी त्यांच्याशी वाद घातला. डिसिल्वा ओव्हरटेक करण्यासाठी जागा देत नसल्यामुळे चारचाकी वाहनातील स्वप्निल केकरे नामक आरोपीचा रागाचा पारा चढला. त्यामुळे ओव्हरटेक करून पुढे गेल्यानंतर आरोपी स्वतःच्या गाडीतून बाहेर आले आणि त्यांनी जेरीलन डिसिल्वा यांना मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर जेरीलन यांनी त्याच अवस्थेत व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर टाकला.

जेरीलन डिसिल्वा यांनी व्हिडीओमध्ये दावा केला की, आरोपीने त्यांचे केस ओढून तोंडावर आणि नाकावर दोनवेळा बुक्का मारला. ज्यामुळे नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. माझी लहान मुलं बरोबर असतानाही आरोपी थांबला नाही, त्याने मला बेदम मारहाण करून पळ काढला. माझ्याबरोबर काहीही होऊ शकले असते, अशी उद्विग्न प्रतिक्रिया जेरीलीन यांनी मारहाणीनंतर दिली. जेरीलन यांचा व्हिडीओ सध्या सोशळ मीडियावर व्हायरल झाला असून अनेक लोक त्यावर व्यक्त आहेत. पुणे जिल्ह्यात नेमके काय चाललंय, लोक इतक्या खालच्या पातळीवर का उतरत आहेत? लोकांना कायद्याची भीती उरली नाही का? असे प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून आरोपींवर भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. चारचाकी वाहनातील आरोपी स्वप्नील केकरे आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी स्वप्नील यांची पत्नी घटना घडली तेव्हा गाडीतच उपस्थित होती, त्यामुळे त्यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे. डीसीपी विजयकुमार मगरे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, हा गुन्हा चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात दाखल झाला असून आम्ही पुढील तपास करत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon