बारामतीत पालखी महामार्गावर कारचा टायर फुटून भीषण अपघात; काँग्रेस नेते आबासाहेब निंबाळकरांच्या मुलाचा जागीच मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – बारामती तालुक्यात झालेल्या भीषण अपघातानं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. बारामतीतील राष्ट्रीय महामार्गावर रुई लीमटेक मार्गावर कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात इंदापूरमधील काँग्रेस नेत्याच्या २२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. आदित्य आबासाहेब निंबाळकर असं मृत तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. इंदापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांना पुत्रशोक झाला आहे. बारामतीतील राष्ट्रीय महामार्गावर रुई लीमटेक मार्गावर गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात इंदापूर तालुक्याचे काँग्रेस अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास बारामती तालुक्यातील रुई गावच्या पाटीजवळ हा भीषण अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, आदित्य हा काटेवाडीकडून रुई मार्गे बारामतीत येत होता. त्याच्या चारचाकी गाडीचा टायर फुटला आणि महामार्गावर गाडी पलटी झाली. त्यानंतर कार एका इमारतीच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात आदित्य निंबाळकर गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत, आदित्यला गाडीतून बाहेर काढलं. जखमी आदित्यला स्थानिक रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण, अपघातात त्याला झालेली दुखापत खूपच गंभीर होती. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, आदित्यच्या मृत्यूमुळे निंबाळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, संपूर्ण बारामती तालुक्यातून या घटनेमुळे शोक व्यक्त केला जात आहे.