ललित पाटील ड्रग्स प्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई; पुणे पोलीस दलातील २ कर्मचारयांना सेवामुक्तीचे आदेश
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी सहा, सात महिन्यानंतर मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलीस दलातील २ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलीस दिलातील काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. परंतु चौकशीत दोषी आढळल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. या प्रकरणात सूसन रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसह एकूण १५ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल ३१५० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. ललित पाटील ससून हॉस्पिटल पलायन प्रकरणी सर्वात मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे. ड्रग्स माफिया ललित पाटील याला ससून रुग्णालयात एक्स रे साठी घेऊन जाणारे २ पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. पुणे पोलीस मुख्यालयातील हे दोघे कर्मचारी आहेत. पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत.
ललित पाटील पळून गेल्याची माहिती पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे यांनी नियंत्रण कक्षास तीन तास उशीराने दिली. त्यामुळे ललित पाटील याला पकडता आले नाही. तसेच हे दोघे ललीत पाटील सोबत एक्सरे साठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. यामुळे या दोन पोलिसांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहरात घडलेल्या या प्रकरणामुळे राज्यात काही महिन्यांपूर्वी खळबळ माजली होती. ड्रग्स माफिया असलेला ललित पाटील एका ड्रग्स प्रकरणात पुणे येथील येरवडा कारागृहात होता. परंतु तो कारागृहात न राहता महिनोमहिने ससून रुग्णालयात मुक्काम ठोकत होता. त्यानंतर रुग्णालयातून हवे तेव्हा तो हॉटेलमध्ये जात होता. त्याची चांगली बडदास्त पोलीस कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ठेवली होती. हे प्रकरण उघड झाल्यानंतर तो ससून रुग्णालयातून फरार झाला होता.