अंधेरीच्या मरोळमध्ये प्रेम प्रकरणाच्या वादातून तरुणीची हत्या, आरोपीला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – अंधेरीत प्रेम प्रकरणातील वादातून मरोळ येथे तरुणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हाती आलेल्या प्रथमिक माहितीनुसार प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून झैब ख्वाजा हुसैन सोलकर असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला अंधेरीतील सहार पोलिसांनी अटक केली आहे. तर सारा असे या घटनेतील मृत मुलीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झैब आणि सारा या दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून प्रेमसंबध होते. मात्र अनेक गेल्या काही दिवसांपासून काही कारणांवरून दोघांमध्ये किरकोळ वाद होऊन त्यातून नेहमी खटके उडत होते. दरम्यान, ३० जून रोजी सारा ही मरोळ येथील भावाच्या घरी एकटी होती. या संधीचा फायदा घेत संशयित आरोपी झैब याने साराच्या भावाचे मरोळ येथील घर गाठले आणि त्यात पुन्हा त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की रागाच्या भरात झैब याने साराच्या ओढणीने तीचाच गळा आवळून हत्या केली. त्यानंतर झैब याने घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान हा संपूर्ण प्रकार उशिरा लक्षात आल्याने तो पर्यंत साराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच सहार पोलिसांनी घटनास्थाळ गाठत पुढील कारवाई करत झैब सोलकर विरोधात ३०२ भा द वी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या सहार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.