पुण्यात जमिनीच्या वादातून बिल्डरने रोखली शेतकऱ्यावर बंदूक? पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – विश्रांतवाडी मध्ये एका बिल्डरने एका व्यक्तीवर बंदूक रोखल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रांजणगावातील जमीन बिल्डरने विकत घेतली होती. मात्र, पैशाच्या वादातून बिल्डरने त्या व्यक्तीला बंदूक दाखवून धमकावल्याची तक्रार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत बिल्डरने दाखवलेले पिस्टल नसून लायटर असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे राहणारे मंगेश शिवाजी पंचमुख (वय 34 व्यवसाय ड्रायव्हर) यांनी 3 एप्रिल 2023 रोजी प्रभाकर पांडुरंग भोसले, दीपक राजकुमार पंचमुख, सचिन भालचंद्र पंचमुख, किरण अशोक पंचमुख यांच्या विरोधात तक्रार अर्ज केला होता. यामध्ये त्यांनी दीपक, सचिन आणि किरण यांनी बळजबरीने रांजणगाव येथून त्यांच्या कार मध्ये घेऊन जाऊन विश्रांतवाडी येथे प्रभाकर भोसले यांच्या ऑफिसमध्ये नेले. त्याठिकाणी प्रभाकर भोसले यांनी पिस्टल दाखवून धमकविल्याचे तक्रार अर्जात नमूद केले होते. तसेच घटनेचा व्हिडीओ पेन ड्राईव्ह मध्ये पोलिसांना दिला होता.
त्या अनुषंगाने पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी केली असता, त्यामध्ये यातील अर्जदार मंगेश पंचमुख यांची रांजणगाव गणपती येथील जमीन प्रभाकर भोसले यांनी खरेदी केली होती. त्याबाबतचे सर्व व्यवहार हे पूर्ण झालेले होते. तसेच मंगेश पंचमुख यांनी भोसले यांना इतर जमिनीच्या व्यवहारांमध्ये मदत केली होती. त्यामुळे भोसले यांनी मदत म्हणून मंगेश यांना घर बांधण्याकरिता सहा लाख रुपये रक्कम देण्याचे कबूल केले होते. ती रक्कम देण्यास प्रभाकर भोसले हे टाळाटाळ करत होते. प्रभाकर भोसले यांनी सुरुवातीस दोन लाख रुपये रक्कम दिल्याने मंगेश यांनी त्यांचे राहते घर पाडून बांधकाम चालू केले. मात्र त्यांना राहण्याकरिता अडचण होऊ लागल्याने त्यांनी उर्वरित पैशासाठी वारंवार भोसले यांना संपर्क केला. मात्र भोसले यांनी पैसे देण्यास टाळा केल्याने तसेच व्हिडिओमध्ये दाखवलेले पिस्टल नसून लायटर असल्याचे मंगेश पंचमुख यांना माहीत असताना केवळ ठरल्याप्रमाणे घर बांधकामाचे पैसे मिळवण्याच्या उद्देशाने अर्ज केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
याबाबत अर्जदार मंगेश पंचमुख यांनी सविस्तर २६ एप्रिल २०२३ रोजी पोलिसांकडे जबाब दिलेला आहे तसेच त्यांची एकमेकांविरुद्ध काही एक तक्रार नसल्याचा लेखी जबाब पोलिसांनी घेतला आहे. तसेच तक्रारी अर्ज २७ एप्रिल २०२३ रोजी दप्तरी फाईल करण्यात आलेला असून सदरचे लायटर हे प्रभाकर भोसले यांनी फिर्यादी यांचे समक्ष पोलीस ठाण्यात जमा केले आहे. अर्जदार मंगेश पंचमूख यांनी ओळखून तेच असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.