स्नॅपचॅट ऍप डाऊनलोड करण्यास वडिलांनी विरोध केल्याचा रागातून डोंबिवलीत अल्पवयीन तरूणीने घेतला गळफास
योगेश पांडे / वार्ताहर
डोंबिवली – स्नॅपचॅट ऍप मोबाईलमध्ये स्थापित करून समाज माध्यमांच्या नाहक संपर्कात राहू नको, अशी सूचना डोंबिवलीतील निळजे येथील लोढा हेवन मध्ये राहत असलेल्या वडिलांनी आपल्या १६ वर्षाच्या मुलीला केली होती. तरीही वडिलांचे न ऐकता मुलीने स्नॅपचॅट ऍप गुपचूप स्थापित केले. यावरून वडिल ओरडल्याने राग अनावर झाल्याने मुलीने आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन शुक्रवारी रात्री आत्महत्या केली. संभाजी सदाशिव पाटील – ४२ असे तक्रारदार वडिलांचे नाव आहे. त्यांंनीच आपल्या मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची माहिती मानपाडा पोलिसांंना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. स्नॅपचॅटच्या माध्यमातून स्वताची छायाचित्रे काढून ती समाज माध्यमात पसरविता येतात. यामधून इतर प्रतीक्षेतील समाज माध्यमी अशा छायाचित्रांना आपल्या परीने पसंती देतात. हा प्रकार योग्य नसल्याने आणि त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता होती. त्यामुळे संभाजी पाटील यांनी आपल्या सोळा वर्षाच्या मुलीला स्नॅपचॅट उपयोजन आपल्या मोबाईलमध्ये स्थापित न करण्यास सांगितले होते.
तरीही वडिलांचे न ऐकता तिने मोबाईलमध्ये स्नॅपचॅट स्थापित केले. ही माहिती वडील संभाजी पाटील यांना समजताच, त्यांनी याविषयी मुलीसमोर नाराजी व्यक्त करून तिला असा प्रकार पु्न्हा न करण्यास बजावले होते. वडिलांचा सल्ला न आवडल्याने आणि राग अनावर झाल्याने संभाजी यांच्या अल्पवयीन मुलीने घरातील शय्या गृहात शुक्रवारी रात्री साडे तीन वाजताच्या दरम्यान ओढणीने गळफास घेतला. रात्री उशिरा हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.