धक्कादायक! नीट पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी चौकशी करुन सोडलेला एक शिक्षक फरार, तर दुसऱ्या शिक्षकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Spread the love

धक्कादायक! नीट पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी चौकशी करुन सोडलेला एक शिक्षक फरार, तर दुसऱ्या शिक्षकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

योगेश पांडे / वार्ताहर 

लातूर – नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर आलं आहे. त्यानंतर नांदेड येथील एटीएसच्या टीमनं शनिवारी लातुरातून दोन जिल्हा परिषद शिक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. अनेक तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. त्यानंतर काही तासांनी लातूर पोलिसांनी तपास सुरू केला. यातील एका शिक्षकाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. मात्र, संजय जाधव हे शिक्षक फरार झाले आहेत. या प्रकरणात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. नांदेड एटीएसनं चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून दिलेला शिक्षक संजय जाधव फरार झाला आहे. त्या शिक्षकाच्या तपासासाठी आता पोलीस पथक रवाना झालं आहे. मात्र, रविवारी संध्याकाळपासून संजय जाधव यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाही.

लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा येथील रहिवाशी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असून ते फरार आहेत. लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. पठाण नावाच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाला रविवारी लातूर पोलिसांनी ताब्यात घेतलं. नांदेड एटीएसनं संशयाच्या आधारावर दोन शिक्षकांना ताब्यात घेतलं होतं, त्यांची कसून चौकशी केली होती. काही धागेदोरेही सापडले होते, असं असतानाही त्यांना सोडण्यात आलं होतं. यातील एक शिक्षक आता फरार असल्याची धक्कादाय माहिती समोर आली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणातील महाराष्ट्र कनेक्शनमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. शनिवारी सकाळपासून नीट पेपर फुटी प्रकरणी विविध घटना घडामोडी घडत होत्या. मात्र पोलिसांकडून कोणतीही माहिती समोर येत नाही. यामुळे संभ्रम वाढत चालला आहे. रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत वेगवान हालचाली झाल्या आहेत. शनिवारी एटीएसनं चौकशी करून सोडून दिलेल्या दोन शिक्षकांपैकी पठाण या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शहर पोलीस उपाधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांसमोर पठाण यांची चौकशी करण्यात आली. रात्री बारानंतर पोलिसांनी तपासासाठी विविध पथकं तयार केल्याची माहिती आहे. याबाबत कोणतेही अपडेट देण्यास पोलीस तयार नाहीत. मात्र, पेपरफुटी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारपासून आतापर्यंत यात किती लोकांची चौकशी झाली? किती लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला? याबाबत स्पष्टता नाही. मात्र जाधव आणि पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे. याव्यतिरिक्त आणखी इतर दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले दोन शिक्षक जिल्हा परिषद शाळेतील असून एका लातूर आणि एक सोलापुरात कार्यरत आहेत. लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा येथील रहिवाशी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते कार्यरत आहेत. लातूरच्या अंबाजोगाई रोड भागांत राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.

वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत (नीट) घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का? या दृष्टीनं तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले. त्यानंतर चौकशी करून त्यांना सोडण्यात यायला हवं होतं. मात्र, रविवारी संध्याकाळी पुन्हा यातील पठाण नावाच्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोन पेक्षा अधिक लोकांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon