पवईत जय भीमनगर परिसरातील झोपड्यांवर अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई

Spread the love

पवईत जय भीमनगर परिसरातील झोपड्यांवर अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई

अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर तुफान दगडफेक, पाच ते सहा पोलीसही जखमी

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबई उपनगरातील पवई परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या पथकावर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पवईच्या भीमनगर परिसरात हा प्रकार घडला. याठिकाणी असलेल्या झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. जय भीमनगर हा झोपडपट्टीचा परिसर आहे. येथील काही झोपड्या पाडण्यात आल्या होत्या. मात्र, स्थानिकांच्या जमावाने वस्तीच्या तोंडाशी उभे राहून वाट अडवून धरली. त्यानंतर या जमावाने पालिका अधिकाऱ्याच्या दिशेने दगडांचा तुफान मारा केला. यावेळी केवळ मुंबई पोलीस दलातील जवान प्रोटेक्शन शील्ड घेऊन उभे राहिल्यामुळे पालिका अधिकारी थोडक्यात बचावले. मात्र, या तुफान दगडफेकीत पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. दोन महिन्यांपूर्वी या झोपडपट्टी भागात आगीची घटना घडली होती त्यानंतर या ठिकाणच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना मुंबई महापालिकेकडून जागा खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी कारवाईसाठी अधिकारी आले असताना अधिकाऱ्यांवर जमावाने दगडफेक केली. रहिवासी आक्रमक झाल्यानंतर तात्काळ मुंबई महापालिकेने कारवाई थांबवली.

२००५ साली पवईतील जयभीमनगर परिसरात कामगारांना तात्पुरता ट्रान्झिस्ट कॅम्प तयार करण्याची परवानगी देण्यात आली होती. नंतरच्या काळात याठिकाणी झोपड्यांची मोठी वसाहत निर्माण झाली. ही जागा शासकीय वसाहतीसाठी राखीव असल्याने पालिकेने अनेकदा याठिकाणी अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवेळी हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. आजदेखील पालिकेचे पथक पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन अतिक्रमण पाडण्यासाठी याठिकाणी आले होते. मात्र, पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिकांनी वस्तीच्या तोंडावर उभे राहून पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांची वाट रोखून धरली. पालिका अधिकाऱ्यांनी पुढे येण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्थानिक रहिवाशांनी दगडांचा तुफान मारा सुरु केला. पोलिसांनी त्यांच्याकडे असणाऱ्या फायबरच्या ढालींनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेक इतकी जोरात झाली की, यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon