पुण्यात सोने खरेदीमध्ये ‘भांबुर्डेकर सराफ अँन्ड ज्वेलर्स’ ची कोट्यवधीची फसवणूक
पुणे – पुण्यातील भोसरी येथे एका नामांकित सराफा व्यावसायिकाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याची घटना घडली आहे. सोने खरेदीमध्ये सोनाराची तब्ब्ल १ कोटी ८७ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि.३०) विलास महादेव भांबुर्डेकर (वय ६० रा.भोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी भावेश संपतराज जैन (वय ४३ रा.मुंबई) व जिग्नेश प्रितम जैन (वय ५२ रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भोसरीतील भांबुर्डेकर सराफ अँन्ड ज्वेलेर्स यांनी बीएसजे बुलीयन मेटल हब एलएलपी कंपनी यांच्याकडून वेळोवेळी सोने खरेदी केले. यासाठी कंपनीच्या खात्यावर १ कोटी १६ लाख ४४ हजार १५० एकदा व ५८ लाख २२ हजार ७५ रुपये असे एकूण १ कोटी ८७ लाख ६६ हजार ९७ रुपये पाठवले. मात्र आरोपींनी फिर्यादींना सोने पाठवले नाही.
याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता बिल चुकले आहे, बिलदुरुस्त करून सोने पाठवतो, आता आम्ही गोल्ड एक्झीबीशनमध्ये आहोत असे म्हणत सोने व पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे फिर्यादीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भोसरी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत.