अवैध माती उत्खननावर केळवा पोलिसांची कारवाई…
पोलिसांनी ३६ लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत…
पालघर / नवीन पाटील
केळवा सागरी पोलीस स्टेशन हद्दीतील सरावली गावात अवैधरीत्या माती उत्खनन करणाऱ्यावर बुधवार १० एप्रिल रोजी केळवा सागरी पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ३६ लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.
केळवा सागरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांना सरावली गावात विना रॉयल्टी अवैध मातीचे उत्खनन करून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुशंघाने केळवा सागरी पोलिसांच्या पथकाने बुधवार १० एप्रिल रोजी तेथे धाड टाकली. यात अनस आशपाक खान (वय २७ वर्षे) राहणार मूळचा उत्तर प्रदेश हा हायवा ट्रॅक चालक विनापरवाना १२ ब्रास म्हणजे ट्रॅकच्या क्षमतेच्या दुप्पट भार अवैध मातीची वाहतूक करताना आढळला. पोलिसांनी आरोपी चालकाला तत्काळ ताब्यात घेऊन हायवा ट्रॅक आणि १२ ब्रास रेती असा ३६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. याप्रकरणी केळवा सागरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनी दत्ता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जनाथे अधिक तपास करीत आहेत.