नागरिकांना त्रास देणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुंडा पथकाच्या पोलिसांनी धू धू धुतले
पोलीस महानगर नेटवर्क
पिंपरी – आकुर्डी भागात दहशत पसरविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुंडा विरोधी पथकाने गजाआड केलं आहे. रात्रीच्या सुमारास रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना विरेंद्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (वय-25 रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) नावाचा गुंड त्रास देत होता. याबाबतची माहिती गुंडा विरोधी पथकाला मिळताच त्याला चांगलाच चोप देऊन बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई आकुर्डी भागातील उर्दू शाळेसमोर शनिवारी (दि.६) रात्री करण्यात आली. बेंद्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.
पिंपरीच्या आकुर्डी भागात एक उर्दू शाळा आहे. येथून नागरिकांची चांगली वर्दळ सुरू असते. या भागात सराईत गुंड बेंद्याची दहशत होती. तो येथील रस्त्यावर शर्ट काढून फिरायचा. बऱ्याचवेळा तो दारुच्या नशेत असायचा. त्यामुळे आपण काय करतोय?यावर त्याचे नियंत्रण नव्हते. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. काहींना तर याने विनाकारण मारहाण केल्याच्या तक्रारी होत्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे इथल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. बेंद्या सोनी असे या गुंडाचे नाव असून तो रात्रीच्या वेळी नागरिकांना बराच वेळ त्रास द्यायचा. गुंडा विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेऊन भररस्त्यात चोप देऊन झोडपून काढण्यात आले.