प्रेयसीसोबत मौजमजा व दारूच्या व्यसनापायी सराफा कर्मचारी बनला चोर
१५ दिवसांनंतर नौपाडा पोलिसांनी आरोपीच्या आवळल्या मुसक्या, ६२ लाख १० हजार रुपयांचे दागिने जप्त
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – दारूच्या व्यसनासाठी आणि मैत्रिणी सोबत मौजमजा करण्यासाठी एक कर्मचारी चोर बनला. त्याने एका प्रसिद्ध सराफा दुकानामधून १ कोटींहून अधिक किमतीचे दागिने चोरले होते, चोरी केल्यानंतर राहुल जयंतीलाल मेहता या चोराने दागिने घेऊन फरार झाला होता, मात्र तब्बल १५ दिवसांनंतर नौपाडा पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ६२ लाख १० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. न्यायालयाने आरोपी मेहताला पोलीस कोठडी सुनावली आहे. तो त्याच्या मैत्रिणीला भेटायला आला असता पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
चौकशीत कर्मचारी असलेल्या मेहताला दारू पिण्याचे व्यसन असल्याचे समोर आले आहे. दारूच्या व्यसनापायी आणि मैत्रिणीसोबत मौजमजा करण्यासाठी त्याने दागिने चोरण्यास सुरुवात केली. मुंबईतून फरार झाल्यानंतर तो इंदूर आणि गुजरातमध्ये गेला होता. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने आपला मोबाईलही बंद केला होता. ९ मार्च रोजी शोरूममधून ३८ लहान-मोठे नेकलेस, २४ जोड्या कानातले, ३ सोन्याच्या चेन, ५ बांगड्या समवेत कोटी ५ लाख ५५ हजार ७६६ रुपये किमतीचे दागिने गायब झाले होते. दुकान मालकाने राहुलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद असल्याचे आढळले. त्याच्या पत्नीची चौकशी केली असता तो ८ मार्चपासून घरी आला नसल्याचे समोर आले. त्याच्या पत्नीने नौपाडा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर २५ मार्च रोजी दुकान मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी राहुलविरुद्ध दागिने चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
पोलीस उपायुक्त सुभाष बारसे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन आणि पीआय शरद कुंभार यांच्या नेतृत्वाखाली एपीआय मंगेश भांगे आणि पीएसआय संगम पाटील यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासादरम्यान राहुल हा त्याच्या मैत्रिणीला मीरा रोड येथे भेटायला येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्याचवेळी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले.