धक्कादायक ! बदलापूर हादरलं, तब्बल १८ दिवसानंतर कुळगाव ग्रामीण पोलिसांना यश
किरकोळ भांडणावरून जावयाच्या हत्येप्रकारणी सासर्याला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
बदलापूर – मुरबाड रस्त्यावरील मोऱ्याचा पाडा गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या जावयाची निर्घृण हत्या केली आहे. जावयाला बेदम मारहाण करुन प्लास्टिकच्या पिशवीत भरून घरापासून लांब फेकल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. गावातील बारवी नदीवरील पुलाखाली १ मार्च रोजी दगडावर एक व्यक्ती बेशुद्ध जखमी अवस्थेत आढळला होता. त्यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला, या प्रकरणी कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. दरम्यान, १८ दिवसानंतर कुळगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून सदर व्यक्तीच्या सासर्याला या हत्येप्रकरणी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश केणे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. पोलीस तपासात या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. २९ फेब्रुवारी रोजी दारूच्या नशेत योगेश याने सासरा संतोष नाईक याला शिविगाळ केली होती. या वादातून संतोष याने त्याला पकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. योगेश बेशुद्ध होऊन खाली पडताच त्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरले. नंतर ही पिशवी दुचाकीवरून घरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर मोऱ्याचा पाडा गावाच्या हद्दीत असलेल्या पुलावरून बारवी नदीच्या पात्रात दगडावर फेकली. त्यामुळे गंभीर जखमी होऊन योगेशचा मृत्यू झाला. या प्रकरणात जावयाची हत्या केल्याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या कुळगांव पोलिसांनी सासरा संतोष नाईक याला अटक केली आहे. अशी माहिती कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी दिली.
सदरच्या गुन्ह्याचा तपास डॉ. डी. एस स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण तसेच श्रीमती डॉ. दिपाली घाटे, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, जगदिश शिंदे उप विभागीय पोलीस अधिकारी, मुरबाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सपोनि गोविंद पाटील, केंगार, पवार, खडताळे, राहुल दाभाडे या पथकाने गुन्हयांची उकल करुन आरोपीतास अटक केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गोविंद पाटील प्रभारी अधिकारी, कुळगांव पोलीस ठाणे हे करत आहेत.