तीन वर्षीय मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला एपीएमसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; दुसरा आरोपी फरार
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई – एपीएमसीतील एकता नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण करून दुचाकीवरून पळून गेलेल्या दुकलीतील एकाला कोपरखैरणे पोलिसांनी शोधमोहीम राबवून अटक केली आहे. साहिल म्हात्रे (वय २३) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली आहे तसेच पुढील कारवाईसाठी त्याला एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणात सहभागी असलेला दुसरा आरोपी मनीष सोनी (वय २५) हा फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एपीएमसी मधील पुनीत कॉर्नर झोपडपट्टी परिसरात हि घटना घडली आहे. परिसरात राहणारी ३ वर्षीय मुलगी रस्त्यालगत खेळत असताना एक दुचाकीस्वार त्याठिकाणी आला. त्याने मुलीला खायला देण्याचे आमिष दाखवून दुचाकीवर बसवून नेले होते. हा प्रकार पालकांच्या निदर्शनात येताच त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे यांनी तातडीने मुलीच्या शोधासाठी पथके तयार केली होती. त्यामध्ये दुचाकीच्या माहितीवरून संशयित तरुणांच्या घरापर्यंत पोलिस पोहचले होते. त्याचवेळी पोलिस आपल्या मागावर असल्याचे तरुणाला समजताच त्याने रात्री १० च्या सुमारास सदर मुलीला परत त्याच परिसरात सोडून पळ काढला. यावेळी मुलीसोबत गैर कृत्य घडले आहे का हे तपासण्यासाठी पोलिसांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यासोबत काही घडले नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे नेमके कोणत्या कारणांनी तिचे अपहरण केले होते असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. त्यासाठी संबंधित तरुणाच्या मागावर पोलिस आहेत. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात संबंधितांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.