चिंचवडमध्ये गॅस गळतीमुळे घरात भीषण अग्नितांडव, एकाच कुटुंबातील ५ जण होरपळून जखमी
चिंचवड – घरातील सिलेंडर मधून गॅस लिकेज होऊन घरातील मच्छर मारण्यासाठी अगरबत्ती पेटवली असता घरात पसरलेल्या गॅसचा भडका उडाला आणि त्यात घरातील पाचजण भाजले. ही घटना शनिवारी रात्री विद्यानगर, चिंचवड येथे घडली. शंकर पोपट चव्हाण, अश्विनी शंकर चव्हाण, सुशीला पोपट चव्हाण आणि शंकर चव्हाण यांची दोन मुले जखमी झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शंकर चव्हाण यांच्या घरातील सिलेंडर लिकेज होता. त्यातून बराच वेळ गॅस गळती सुरु होती. शनिवारी रात्री घरातील मच्छर मारण्यासाठी शंकर यांनी मच्छर अगरबत्ती पेटवली असता घरात पसरलेल्या गॅसचा भडका उडाला. यावेळी घरात शंकर चव्हाण, त्यांची पत्नी अश्विनी, आई सुशीला चव्हाण, १० वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी असे पाचजण होते. अचानक उडालेल्या भडक्यात घरातील पाचजण होरपळले गेले. जखमींना तत्काळ उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.