धक्कादायक ! तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरला ; सैतान आरोपीला बेड्या
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात सध्या हत्येचे सत्र सुरूच आहे, ३ मार्च रोजी नागभीड तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला, पतीने २ मुली व पत्नीची कुऱ्हाडीने वार करीत हत्या केली. सदर हत्याकांड हे मध्यरात्री घडलं असा अंदाज वर्तविण्यात येत आहे, नागभीड तालुक्यातील मौशी येथे ५० वर्षीय अंबादास तलमले हे आपल्या कुटुंबासह राहत होते. काही दिवसापासून तलमले कुटुंबात कौटुंबिक कलह सुरू होता, त्या कलहाचे रूपांतर भीषण हत्याकांडात बदलले, यात पत्नी अलका, मुलगी तेजू आणि प्रणाली या तिघींचा मृत्यू झाला.
नागभीड पोलिसांनी या प्रकरणी आरोपी अंबादास यांना अटक केली आहे. विशेष बाब म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा अंबादास यांचा मुलगा बाहेर गेला होता, तो घरी असता तर त्याच्या जीवाचे बरे वाईट झाले असते. चंद्रपूर जिल्ह्यात नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत हत्येच्या तब्बल १२ घटना घडल्या आहे. या तिहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहेत.
बारावीचे पेपर संपण्याआधी जीवन संपविले
लहान मुलगी तेजू तलमले ही इयत्ता बारावीची विद्यार्थिनी आहे. सध्या बारावीचे पेपर सुरू आहेत. बारावीत चांगल्या गुणांसहित उत्तीर्ण होण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र डोक्यात सैतान शिरलेल्या तिच्या वडिलांनी तिच्या स्वप्नांचा चुराडा केला.