गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या भागवत बंधूंचे अपहरण; नाशिक पोलिसांनी काही तासांत केली सुटका!
नाशिक – माऊली मल्टीस्टेट व संकल्पसिद्धीमध्ये आर्थिक फसवणूक प्रकरणातील संशयित विष्णू व रुपचंद भागवत बंधूंचे अपहरण करण्यात आले असता, गुरुवारी (ता. २९) दोघांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी शहर गुन्हेशाखेच्या पथकाने एकाला अटक केली असून, सरकारवाडा पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत बंधू काही कामानिमित्त बुधवारी (दि.२८) नाशिक जिल्हा न्यायालयात आले होते. सायंकाळी सात वाजता सीबीएस परिसरात आपली गाडी पार्क केलेल्या ठिकाणी आले असता अपहरणकर्त्यांनी त्यांना दुसऱ्या कारमध्ये डांबून अपहरण केले. हा प्रकार उघड झाल्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवून शोध सुरू केला. अपहरणाचा प्रकार परिसरातील सीसीटीव्हीतही कैद झालाय. शोध सुरू असताना गुप्त माहितीच्या आधारे अपहरणकर्ते नाशिक जिल्ह्याबाहेर गेल्याचे पोलिसांना समजल्याने पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवून विविध पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना केली.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात रुपचंद रामचंद्र भागवत (३९, रा. गवंडगाव, ता. ये वला) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित वेदांत येवला, प्रशांत, संभाजी, सुनील, राकेश सोनार व इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी अपहरण करण्यासाठी तीन कार वापरल्याचे समोर आले आहे. त्यात एमएच ०४ डीएन ९६७७ या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची एक्सयुव्ही कार व संशयित राकेश सोनार याच्याकडील कार वापरल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.