उध्दव ठाकरेंचा नवा लूक; रुद्राक्षाच्या माळांची रंगली चर्चा
नाशिक : अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे उध्दव ठाकरे यांनी सहकुटुंब नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. यावेळी उध्दव ठाकरेंच्या नव्या लूकची चांगलीच चर्चा रंगली आहे. भगवा कुर्ता, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा अशा रुपात काळाराम मंदिरात बाळासाहेबांच्या लुकमध्ये उद्धव ठाकरेंनी पूजा केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज नाशिकमधल्या पंचवटीतील काळाराम मंदिरात श्रीरामाची महाआरती करून सहकुटुंब दर्शन घेतलं.त्यांच्यासमवेत पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. ठाकरे कुटुंबानं वैदिक मंत्रोच्चारात श्रीरामाची पूजा केली. काळाराम मंदिरात ठाकरे कुटुंबानं शिवसेना कार्यकर्त्यांसह काळारामाची आरती देखील केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीनं उद्धव ठाकरेंचा सत्कार करण्यात आला. काळाराम दर्शनानंतर ठाकरे कुटुंब गोदा तीरावर जाऊन महाआरती केली. त्याआधी उद्धव ठाकरेंनी आपल्या नाशिक दौऱ्यात भगूरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय करंजरकर यांनी उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात पूजा केल्यानंतर ते गोदातीरी गेले. पण गोदाघाटावर यावेळी प्रवेशासाठी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. शिवसैनिकांनी पोलिसांचे बॅरिकेट्स आणि मेटल डिटेकटर तोडून गोदा घाटावर प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसैनिक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.
शिवसैनिकांची यावेळी प्रचंड गर्दी बघायला मिळाली. शिवसैनिक मोठ्या संख्येत गोदा घाटावर दाखल झाले. यावेळी आयोजकांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे गोदा घाटावर दाखल झाले. अतिशय मनोभावे यावेळी गोदातीरी पूजा करण्यात आली. पुजाऱ्यांकडून यावेळी मंत्रोच्चार करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली.