डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत रस्त्यांमध्ये अडथळा ठरणारी बेवारस वाहने जप्त

Spread the love

डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत रस्त्यांमध्ये अडथळा ठरणारी बेवारस वाहने जप्त

मुंबई महानगर पालिकेच्या कार्यवाईत आता पर्यन्त ५५७२ बेवारस वाहने जप्त. त्यांच्या लिलाव करून पालिकेच्या तिजोरीत ४ कोटी ७० लाख ८१ हजार ९७९ रुपयांचा महसूल जमा

योगेश पांडे – वार्ताहर 

मुंबई – रस्त्यांमध्ये अडथळा ठरणारी बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ५,५७२ बेवारस वाहने जप्त करण्यात आली असून त्यांच्या लिलाव प्रक्रियेतून पालिकेच्या तिजोरीत ४ कोटी ७० लाख ८१ हजार ९७९ रुपयांचा महसूल जमा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत मुंबईचे विद्रुपीकरण करणे आणि मुंबईच्या सौंदर्यात अडथळा ठरणारी बेवारस वाहने जप्त करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंग चहल यांनी दिले आहेत. स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी नव्याने नियमावली जारी करण्यात आली असून त्यानुसार बेवारस वाहने जप्त करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित सहायक आयुक्त व वॉर्डातील कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.

आधीच अरुंद रस्ते आणि त्यांच्या दुतर्फा पार्किंग होत असल्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कडेला बेवारस सोडून देण्यात आलेली आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने उचलून नेण्याची कार्यवाही पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार प्रशासनाने धडाक्यात सुरू केली आहे.पालिकेकडे बेवारस वाहनांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. अशा वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याने त्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यानंतर वाहतूक पोलिसांशी समन्वय साधत कार्यवाही सुरू केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. जप्त वाहने संबंधित विभाग कार्यालयांच्या डम्पिंग यार्डमध्ये ठेवण्यात आली आहेत. विहित मुदतीत प्रतिसाद न मिळाल्यास जप्त केलेल्या बेवारस वाहनांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लिलाव केला जातो. लिलाव प्रक्रियेतून पालिकेच्या तिजोरीत ४,७०,८१,९७९ रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon