गद्दारांना पराभवाची धूळ चारून शिवसेनाच विजयाचा गुलाल उधळेल
अलिबागेत शिवसैनिकांचा मेळावा
ओमकार नागावकर
अलिबाग – लोकसभा निवडणुकीत भाजप २५० खासदारांचा आकडा पार करू शकणार नसून इंडिया आघाडीला सत्तेत येण्याची संधी आहे. या सत्तेत शिवसेनेला मानाचे स्थान असेल, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी अलिबागमध्ये केले. तसेच रायगड व मावळ लोकसभा मतदारसंघासह येथील नऊ विधानसभा मतदार संघात गद्दारांना पराभवाची धूळ चारून शिवसेनाच विजयाचा गुलाल उधळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा चेंढरे येथील भाग्यलक्ष्मी हॉलमध्ये झाला. यावेळी गीते यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. संघटना बांधणी व संघटना मजबूत करणे हे सर्व पदाधिकाऱ्यांचे पहिले लक्ष असले पाहिजे. सध्या आपण इंडिया आघाडीत असून, या पुढील सर्व निवडणुकांना इंडिया आघाडी म्हणून सामोरे जा, असा सल्ला गीते यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. तसेच सध्या ज्या पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या त्यामधील तीन राज्यांत भाजप आघाडी विजयी झाली. एका राज्यात काँग्रेस तर एका राज्यात प्रादेशिक पक्ष विजयी झाला आहे. भाजपने तीन राज्यात विजय मिळविला असला तरी काँग्रेस व भाजपला मिळालेल्या मतांमध्ये जास्त अंतर नाही. मात्र याबाबत कुणीही बोलत नाही. जनतेची मानसिकता बदलत असून, आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विजयी होईल, असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला.शिवसेना रायगड संपर्कप्रमुख विष्णू पाटील, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, महिला आघाडी संघटक दीपश्री पोटफोडे, युवासेना जिल्हा अधिकारी अमीर ठाकूर, अलिबाग तालुकाप्रमुख शंकर गुरव, अलिबाग शहरप्रमुख संदीप पालकर, अजित पाटील, सुबोध राऊत यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.