अल्पवयीन मुलाचं अपहरण करून खून करणाऱ्या आरोपींना नारपोली पोलिसांनी ठोकल्या बेड्या
किचकट गुन्ह्याची उकल करण्यात नारपोली पोलिसांना यश
भिवंडी (प्रतिनिधी) – योगेश रवी शर्मा (१६) हा अल्पवयीन मुलगा परत येतो सांगून घरातून निघाला तो परत आलाच नाही म्हणून त्याची आई कुसूम रवी शर्मा (४३) हिने नारपोली पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा बाहेर जातो सांगून गेला तो परत आलाच नाही, त्याचे कुणीतरी अपहरण केले असावे असा संशय व्यक्त केला त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधार्थ तपासकामी पोलीस पथके रवाना करण्यात आली. अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेत असताना सपोनि विजय मोरे यांना गुप्त माहितीच्या आधारे योगेश शर्मा याला कामतघर परिसरात घेऊन गेल्याचे समजले तिथे त्याचे मित्र आयुष झा, मनोज टोपे, अन्या खरात व इतर मित्रांसोबत बऱ्याच दिवसांपासून वाद चालू असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी आयुष विरेंद्र झा (१८), मनोज नारायण टोपे (१९) यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपीनी माहिती दिली की,योगेश शर्मा याने काही दिवसांपूर्वी आयुष झा यास मारहाण केली होती, त्याचा राग मनात धरून व बदला घेण्याच्या उद्देशाने योगेश झा यास रेतीबंदर काल्हेर खाडी किनारी मोकळ्या जागेत दारू पिण्याकरिता बोलावून घेतले.
दारूचा एक एक पेग चढत असताना आयुष झा च्या मनातील रागाचा पारा चढत होता त्याचवेळी आयुष याने त्याच्या अन्य साथीदार अनिकेत खरात उर्फ अन्या, शिवाजी माने व संतोष ताटीपामुल उर्फ चिट्या या सर्वांनी मिळून योगेश शर्मा याचेवर सपासप वार करून त्याचा खून केला. मागे कोणताही पुरावा राहू नये म्हणून योगेश शर्मा याचे प्रेत खड्ड्यात पुरून निघून गेले अशी माहिती ताब्यात घेतलेल्या आरोपीनी दिली. मनोज टोपे याच्या सांगण्यावरून भिवंडी नायब तहसिलदार यांच्या उपस्थितीत योगेश शर्मा याचे प्रेत खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. सदरच्या प्रेताची ओळख नातेवाईकामार्फत पटविण्यात यश आले. आयुष झा, मनोज टोपे,अनिकेत खरात, शिवाजी माने,संतोष ताटीपामुल यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि शरद पवार करीत आहेत.