मुंबईत तब्बल ५५ लाखांची चोरी, दागिने, कपडे परिधान करून इन्स्टाग्रामवर रील्स ; दोघी बहिणीनां पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

मुंबईत तब्बल ५५ लाखांची चोरी, दागिने, कपडे परिधान करून इन्स्टाग्रामवर रील्स ; दोघी बहिणीनां पोलिसांनी ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्राम रीलच्या मदतीने ५५ लाख रुपयांच्या चोरीचा खुलासा केला आहे. पोलिसांनी दोन बहिणींना अटक केली. या दोघी बहिणी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी काम करत होत्या. दोघींनी प्लॅन आखून वृद्ध दाम्पत्याच्या घरातून ५५ लाख रुपयांचे दागिने, महागडे कपडे आणि इतर मौल्यवान सामानांची चोरी केली. त्यानंतर तेच महागडे कपडे आणि दागिने परिधान करून त्यांनी रील व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. याच रीलच्या मदतीने पोलिसांनी चोरीच्या घटनेवरून पडदा उचलला. मुंबईतील काळाचौकी पोलिसांनी या दोन बहिणींना अटक केली आहे. त्यापैकी एकीचं नाव छाया वेतकोळी असून ती २४ वर्षांची आहे. तर दुसरीचं नाव भारती वेतकोळी असून ती २१ वर्षांची आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध दाम्पत्याला घरातील मौल्यवान दागिने आणि कपडे गायब झाल्याचं कळताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात त्यांनी घरात काम करण्यासाठी येणाऱ्या दोन बहिणींचा उल्लेख केला. याप्रकरणी अधिक तपास केला असता पोलिसांच्या निदर्शनास आलं की त्या दोघी बहिणी नेहमी दाम्पत्याच्या घरातील दागिने आणि कपडे परिधान करून रील्स अपलोड करायच्या. पोलिसांनी आधी वृद्ध दाम्पत्याकडून दागिने आणि कपड्यांची ओळख पटवून घेतली. त्यानंतर दोघी बहिणींचं लोकेशन ट्रेस केल्यावर त्या रायगडमध्ये असल्याचं समजलं.

छाया आणि भारती वेतकोळी या बहिणींना पोलिसांनी रायगडमधून अटक केली आणि त्यांच्याकडे असलेले ५५ लाख रुपयांचे दागिने आणि कपडे जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बहिणींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३८१ आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून दोघींची चौकशी सुरू आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon