आयसीआयसीआय होम फायनान्सच्या लॉकरवरच ५ कोटींचा डल्ला; पीपीई किट घालून चोरी, नाशिकमध्ये खळबळ

Spread the love

आयसीआयसीआय होम फायनान्सच्या लॉकरवरच ५ कोटींचा डल्ला; पीपीई किट घालून चोरी, नाशिकमध्ये खळबळ

पोलीस महानगर नेटवर्क

नाशिक – येथील आयसीआयसीआय बँकेतून धाडशी चोरी झाली आहे. बँकेच्या सोने तारण शाखेत कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील आयसीआयसीआय बँकेच्या होम फायनान्स कंपनीच्या जुना गंगापूर नाका शाखेतून ही चोरी झाली आहे. दोन चावी असणारे सेफ्टी लॉकर किल्लीने दोघांनी उघडले. त्यानंतर ४ कोटी ९२ लाख रूपये किंमतीचे दीड किलो सोने लांबवले आहे. दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीमुळे खळबळ उडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील जुना गंगापूर नाका येथील इंदिरा हाइट्स व्यापारी संकुलात आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीची शाखा कार्यरत आहे. या शाखा कार्यालयात असलेल्या सेफ्टी लॉकरमध्ये सुमारे २२२ ग्राहकांची सोन्याचे दागिने ठेवले होते. चार मे रोजी बँकेचे कामकाज आटपून ग्राहकांनी दिवसभर तारण ठेवलेले सोने लॉकरमध्ये ठेवण्यास गेलेल्या बँकेच्या कर्मचा-यास लॉकरमध्ये यापूर्वी तारण ठेवलेले सोने आढळले नाही. त्याने तातडीने संबंधित व्यवस्थापक गुजराती यांना हा प्रकार सांगितला. गुजराती यांनी लॉकर मधील सोन्याचे विवरण तपासले असता लॉकरमधून ४ कोटी ९२ लाखांचे सोन्याचे विविध दागिने चोरून नेल्याचे दिसून आलेय या घटनेची माहिती सरकारवाडा पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

कोरोना काळात रुग्णालयात कर्मचा-यांकडून वापरल्या जाणा-या पांढ-या रंगाच्या सेफ्टी सुटचा एका चोरट्या कडून वापर करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटले आहे. ओळख लपवण्यासाठी दोघांपैकी एकानं पांढ-या रंगाचा कोविड सूट अंगात घातला होता. चेह-यावर मास्क आणि डोक्यावर या सूटची टोपी असल्याचे दिसते. दुस-यानं अंगात एक टी-शर्ट, जीन्स पॅन्ट, डोक्यावर पांढरी टोपी आणि चेह-यावर मास्क लावला आहे. एसीच्या खिडकीतून बँकेत प्रवेश केला. गंगापूर रोड येथील आयसीआयसीआय बँकेची तारण शाखा एका इमारतीच्या दुस-या मजल्यावर आहे. या बँकेबाहेर २४ तास बँकेचा सुरक्षा रक्षक तैनात असतो. बँक बंद झाल्यावर अधिकृत व्यक्तीकडे असलेल्या चाव्यांशिवाय कोणी तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केल्यास सायरन वाजतो तसेच सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. मात्र, चोरट्यांनी दोन्ही यंत्रणा बंद करून दरोडा टाकला. बँकेचे कामकाज बंद झाल्यानंतर एसी दुरुस्तीसाठी असलेल्या खिडकीतून प्रवेश करत ही चोरी केल्याचं समोर आले आहे.

या चोरीमध्ये संबंधित कंपनीच्या आजी-माजी कर्मचा-यांचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकासह आयुक्त कार्यलयातील गुन्हे शाखेकडूनही समांतर तपास केला जात आहे. चोरीच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लवकरच चोरांना पकडण्यात पोलिसांना यश येईल असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon