पुणे शहरात दोन खून; कात्रज, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरातील घटना

Spread the love

पुणे शहरात दोन खून; कात्रज, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरातील घटना

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – एकीकडे शहरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. कात्रज, लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरात या घटना घडल्या आहेत. कात्रज भागातील दत्तनगर परिसरात एका भाजी विक्रेत्याच्या डोक्यात दगड व विट घालून खून करण्यात आला. भाजी विक्री व्यवसायाच्या वादातून खून झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तर लक्ष्मीनारायण चित्रपटगृह परिसरात दुसऱ्या खुनाची घटना घडली आहे. खून झालेल्याची ओळख पटली नसून आरोपीने स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्ह्याची कबुली दिली.

विलास जयवंत बांदल (वय-५२, रा.त्रिमुर्ती रेसिडन्सी, वंडर सिटीजवळ, कात्रज) असे खून झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. कात्रज बाह्यवळण मार्गावर दत्तनगर बस थांब्याजवळ बांदल यांच्या डोक्यात दगड व वीट घालून त्यांचा खून करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. याबाबत अभिषेक विलास बंदाल (वय-२४) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी धाव घेतली.

लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून खून करण्यात आल्याची घटना रविवारी उघडकीस आली. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. खून झालेली व्यक्ती फिरस्ती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी गौतम घनश्याम तुरुपमारे (वय ३६, रा. पर्वती ) याला पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ असलेल्या भुयारी मार्गात भिक्षेकरी आसरा घेतात. भुयारी मार्गात काहीजण अमली पदार्थांचे सेवन करतात. अमली पदार्थांची नशा करताना झालेल्या वादातून खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी गौतम फिरस्ता असून, त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon