भिवंडी लोकसभा मतदारसंघात मवीआकडून डॅमेज कंट्रोल; जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला सुरेश म्हात्रे

Spread the love

भिवंडी लोकसभा मतदारसंघात मवीआकडून डॅमेज कंट्रोल; जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला सुरेश म्हात्रे

योगेश पांडे / वार्ताहर 

भिवंडी – भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांनी स्थानिक मविआ नेत्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या माध्यमातून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न होत असून या मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्यासोबतच असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे. भिवंडीतील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे आणि काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश म्हात्रे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यामुळे भिवंडी मतदारसंघातील ‘मविआ’ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण कायम असताना काँग्रेसचे माजी आमदार रशीद ताहीर व शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांसह सुरेश म्हात्रे यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा आणि प्रचाराची रणनीती आखण्यात आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या गोदामांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई चुकीची आहे. राजकीय दबावामधून ही कारवाई झाली असून स्वतः अधिकारी हतबल आहेत, असे म्हात्रे म्हणाले. भिवंडी लोकसभेत वंचित बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही सर्व एकाच मतप्रवाहाचे असून एकाच विचारांच्या विरोधात आहोत, येत्या काळात त्यातून मार्ग निघेल, असेही म्हात्रे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon