भाजपाचे उद्योगपती असलेले जावई मुंबई गिळायला निघालेत, संजय राऊतांचा हल्लाबोल

Spread the love

भाजपाचे उद्योगपती असलेले जावई मुंबई गिळायला निघालेत, संजय राऊतांचा हल्लाबोल

नवी दिल्ली – धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अदानी समूहाविरोधात आक्रमक आहेत. उद्धव ठाकरे (दि.१६) अदानी समूहाविरोधात मोर्चा काढणार आहेत. धारावीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. गौतम अदानी हे भाजपाचे उद्योगपती जावई आहेत. भाजपाच्या जावयाला मुंबई गिळायची आहे. पण आम्ही हे होऊ देणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. शुक्रवारी त्यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला.धारावीसंदर्भात मोर्चा निघणारच आहे. आंदोलन होणार आहे. धारवी बचाव हा मोर्चा फक्त धारावी साठी नाही तर संपूर्ण मुंबईसाठी आहे. धारावीच्या माध्यमातून भाजपाचे उद्योगपती जावई (गौतम अदानी) मुंबई गिळायला निघाले आहेत. मुंबईची लूट सुरूच आहे. धारावीच्या जावयाला आम्ही मुंबई गिळून देणार नाही. या मोर्चात मुंबईकर उपस्थित असतील, असे संजय राऊत यांनी सांगितले.यादरम्यान संजय राऊत यांनी इंडिया आघाडी आणि आगामी लोकसभेच्या जागा वाटपावर सुद्धा भाष्य केले. महाराष्ट्रात आमचे जागावाटप झाले आहे. राज्यात आमचे उत्तम समन्वय आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही बोलणे शेवटच्या टप्प्यात आहे. आम्ही राज्यात ४० प्लस जागा जिंकू. प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग देशासाठी महत्वाचा आहे, असे संजय राऊत म्हणाले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्यावरून सुद्धा संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.राज्याचे दोन उपमुख्यमंत्री कशाकरता दिल्लीत येत आहेत, माहित नाही. दोन्ही उपमुख्यमंत्री येत आहेत. बहुतेक संसदेची सुरक्षा पाहायला येत असतील. बेरोजगारी महागाईचा मुद्दा आहे.कांदा इथेनॉल प्रकरणी राज्यातील लोक आक्रमक आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले.सरकार अस्थिर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. कोर्टात तारखा पडून घेतल्या जात आहेत.न्यायालयाकडून तारखा वाढवत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर डमरू वाजवत बसले आहेत. एक फुल दोन हाफ हे सरकार… इथं येऊन काय करणार ते? त्यांना दिल्ली मुंबईचा पास काढलेला दिसतोय. त्यांच्या दौऱ्याचा राज्याला काय उपयोग? सगळा खेळ खंडोबा सुरू आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.

ठाकरे गटाचा धारावी ते अदानी कार्यालय मोर्चा

मुंबईत १६ डिसेंबरला ठाकरे गट धारावी ते अदानी कार्यालय असा भव्य मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला मुंबईकरांनी हजर राहावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आले आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्प, वीजबिलात झालेली दरवाढ यांवर जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आली आहे. तसेच, धारावी पुनर्विकासातून झोपडपट्टीतील नागरिकांना हक्काची पक्की घरे मिळणार आहेत. पण, या पुनर्विकास प्रकल्पाच्या योजनेत शेकडो कोटींचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.दरम्यान, मोर्चासाठी ठाकरे गटाने धारावी पोलिसांना पत्र दिले होते. या पत्रातून ठाकरे गटाने मोर्चाला परवानगी देण्याची मागणी केली होती. पण धारवी पोलिसांनी ठाकरे गटाच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. धारावी पोलिसांनी ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. मोर्चाच्या परवानगीसाठी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवा, अशी सूचना धारावी पोलिसांनी ठाकरे गटाला केली आहे. यानंतर ठाकरे गटाने मुंबई पोलिस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिस आयुक्त ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Right Menu Icon