पहाटेच्या अंधारात पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; सराईत इराणी गुन्हेगार जेरबंद

पहाटेच्या अंधारात पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; सराईत इराणी गुन्हेगार जेरबंद

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण – नवी मुंबई आणि कल्याण पोलिसांनी मिळून केलेल्या एका धाडसी कारवाईमुळे गुन्हेगारी जगताला हादरा बसला आहे. अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत इराणी चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पहाटेच्या अंधारात एक विशेष सापळा रचला होता. या संयुक्त कोंबिंग ऑपरेशनमुळे दोन खतरनाक गुन्हेगार आता पोलिसांच्या कोठडीत आहेत.

नवी मुंबईत दरोडा आणि चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असलेले दोन आरोपी कल्याणमधील आंबिवली येथील इराणी वस्तीत लपून बसल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई आणि खडकपाडा पोलिसांनी मिळून या भागात मोठे कोंबिंग ऑपरेशन राबवले. या मोहिमेत तब्बल ७० पोलिसांचा ताफा सहभागी झाला होता.

पोलिसांनी अत्यंत गोपनीयरीत्या राबवलेल्या या मोहिमेत मुसा सय्यद आणि काबुलअली जाफर या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात यश आले आहे. हे दोन्ही आरोपी सराईत असून त्यांच्यावर चोरी आणि दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या पोलीस या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

कल्याणमधील आंबिवली येथील इराणी वस्ती गुन्हेगारांच्या वास्तव्यासाठी ओळखली जाते. याआधी देखील खडकपाडा पोलिसांनी याच परिसरातून १०० पेक्षा जास्त गुन्हेगारांना अटक करून देशातील विविध पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या ताज्या कारवाईमुळे पुन्हा एकदा या वस्तीतील गुन्हेगारी हालचाली समोर आल्या आहेत. डोंबिवलीतील पालावा परिसरातही संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू ठेवण्यात आला आहे.या कारवाईमुळे नवी मुंबई आणि कल्याण परिसरात चोरीच्या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon