भूसंपादन घोटाळ्यात माजी जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; अविनाश पाठकांना आणखी एक धक्का

भूसंपादन घोटाळ्यात माजी जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; अविनाश पाठकांना आणखी एक धक्का

योगेश पांडे / वार्ताहर

बीड : राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्यावर राज्य शासनाने अखेर निलंबनाची कारवाई केली आहे. अटकेनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी शासनाने हा निर्णय घेतला.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार, राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींच्या मोबदल्यात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ७ मे रोजी लातूर येथून अविनाश पाठक यांना अटक करण्यात आली होती. सुरुवातीला न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, पाठक यांचे निलंबन अटकेच्या तारखेपासून लागू करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय बीड येथेच राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, महामार्ग भूसंपादनाच्या १५४ प्रकरणांमध्ये वाढीव मोबदल्याचे आदेश मागील तारखांनी काढण्यात आल्याचा आरोप आहे. अविनाश पाठक यांची २२ एप्रिल २०२५ रोजी बदली झाल्यानंतरही त्यांच्या कार्यकाळातील १ मार्च ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीतील तारखा वापरून आदेश जारी करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

या आदेशांमुळे संबंधित जमिनींचा मोबदला तब्बल २४१ कोटी ६२ लाख रुपयांनी वाढवण्यात आला. त्यापैकी ७३ कोटी ४ लाख रुपयांचे वितरणही खातेदारांना करण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत अधिकृत नोंदवही ठेवण्यात आली नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणात महसूल विभागातील कर्मचारी, वकील आणि इतर संबंधितांसह एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon