शिवडीत पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; एक आरोपी अटकेत, दोघांचा शोध

शिवडीत पैशांच्या वादातून तरुणाची हत्या; एक आरोपी अटकेत, दोघांचा शोध

सुधाकर नाडार / मुंबई

मुंबई : उसने दिलेल्या पैशांच्या वादातून शिवडी परिसरात एका तरुणाची स्क्रू ड्रायव्हरने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ मे २०२६ रोजी पहाटे २.३० ते २.५० वाजण्याच्या सुमारास रामगड येथील मिनर्वा कंपाऊंड परिसरात मोहन कोळी यांच्या टपरीसमोर फिर्यादी, साक्षीदार आणि आरोपी एकत्र बसून जेवण करत होते. त्यावेळी उसने घेतलेल्या पैशांवरून जसिम सय्यद आणि समीर नासिर शेख यांच्यात वाद झाला. वादानंतर दोघांमध्ये शिवीगाळ आणि मारामारी झाली.

दरम्यान, जसिम सय्यद याने त्याच्या स्कुटीत ठेवलेला स्क्रू ड्रायव्हर काढून समीर शेखच्या मानेवर वार केला. यात समीर गंभीर जखमी झाला. उपस्थितांनी त्याला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३८/२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी किसन जयदीप पांडे उर्फ दुबे (वय २२) याला अटक केली असून रिजवान समीर शेख आणि जसिम सय्यद हे दोन्ही आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोर्ट झोनचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक मनोहरे, एपीआय कुले, हवालदार कदम, साटम, मालवदे तसेच पोलीस कॉन्स्टेबल राठोड आणि बडे यांनी तपासात सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon