चौथ्या मजल्यावरून फरशी कोसळली; उल्हासनगरातील ४ वर्षीय चिमुकल्याची मृत्यूशी झुंज
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मधील सरस्वती नगर परिसरात मंगळवारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसर हळहळला आहे. घराजवळ खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुकल्याच्या डोक्यावर चौथ्या मजल्यावरून फरशी कोसळल्याने तो गंभीर जखमी झाला असून मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल येथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. गणेश रूपनारायण असे जखमी चिमुकल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सरस्वती नगरमधील जगदीश इमारतीजवळ गणेश इतर मुलांसोबत खेळत होता. याच वेळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून अचानक एक जड फरशी खाली कोसळली आणि ती थेट गणेशच्या डोक्यावर पडली. जोरदार आवाजासह गणेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गणेशला उपचारासाठी प्रथम उल्हासनगर आणि नंतर कल्याणमधील रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
या घटनेमुळे रूपनारायण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही महिन्यांपूर्वीच गणेशच्या वडिलांचे निधन झाले होते. त्या धक्क्यातून कुटुंब सावरत असतानाच आता एकुलत्या एक मुलावर ओढवलेल्या या संकटामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. आईचा आक्रोश पाहून परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, निवासी इमारतींमधील जीर्ण बांधकाम साहित्य, सैल फरशा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे होणारे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले असून, या घटनेनंतर परिसरातील इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.