चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू

चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू

योगेश पांडे / वार्ताहर 

पालघर – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात झाला असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तब्बल ६०० किलो चांदी घेऊन जाणाऱ्या या व्हॅनने डिव्हायडरला धडक दिल्यानंतर ट्रेलरलाही जोरदार धडक दिली.दरम्यान,सायरस मेस्त्री यांच्या अपघाती निधनानंतरही चारोटी परिसरातील ब्लॅक स्पॉट हटवण्यात एनएसएआयला (NHAI) अपयश आले असून वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे महामार्ग सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर शुक्रवारी सकाळी चांदी वाहतूक करणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात झाला.मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून गुजरातमधील वापी येथील मोदीसन लिमिटेडकडे ६०० किलो वजनाच्या २० चांदीच्या प्लेट्स घेऊन जाणाऱ्या व्हॅन चा अपघात झाला. या चांदीची अंदाजे किंमत १७ कोटी ६6 लाख रुपये असल्याची माहिती आहे.

गुजरातमधील वापीला जाणारी MH-48-BM-3001 क्रमांकाची व्हॅन चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकून मुंबई लेनमध्ये आली.त्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेलरला व्हॅनची जोरदार धडक बसली.या भीषण अपघातात व्हॅन मधील दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.कासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मौल्यवान चांदीचा माल सुरक्षित ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे,अशी माहिती ऑल इंडिया वाहन चालक महासंघाचे प्रवक्ता हर्बन्स सिंग नन्नाडे यांनी दिली आहे.

चारोटी परिसरातील वाढत्या अपघातांमुळे महामार्ग सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.या भागात अनेक ब्लॅक स्पॉट्स असून गेल्या काही महिन्यांत अनेक भीषण अपघात घडले आहेत.विशेष म्हणजे अपघातानंतर मदत करण्याऐवजी माल लुटण्याच्या घटनाही वारंवार समोर येत आहेत.काही दिवसांपूर्वी आंब्यांनी भरलेला टेम्पो पलटी झाल्यानंतर जखमी चालकाला मदत करण्याऐवजी नागरिक आंबे वेचण्यात व्यस्त असल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.त्यामुळे महामार्गांवर अपघातानंतर सुरक्षा व्यवस्था, तातडीची मदत आणि मालमत्तेच्या संरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे,असं मृत्युंजय दूत अकील सय्यद यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon