मंत्री नरहरी झिरवाळ प्रकरणाचा परिणाम; तृतीयपंथीय हक्क मंडळावरून ॲड. पवन यादव यांची हकालपट्टी

मंत्री नरहरी झिरवाळ प्रकरणाचा परिणाम; तृतीयपंथीय हक्क मंडळावरून ॲड. पवन यादव यांची हकालपट्टी

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई : अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित बदनामीप्रकरणी नाव समोर आल्यानंतर राज्य सरकारने राज्यस्तरीय तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळावरील अशासकीय सदस्य ॲड. पवन यादव यांची नियुक्ती रद्द केली आहे. सामाजिक न्याय विभागाने यासंदर्भातील शासन आदेश जारी करत त्यांची हकालपट्टी तत्काळ प्रभावाने करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय धोरण २०२४ अंतर्गत मंडळाची पुनर्रचना झाल्यानंतर एप्रिल २०२५ मध्ये तृतीयपंथी (ट्रान्सवुमन) प्रवर्गातून पवन यादव यांची नियुक्ती करण्यात आली होती. तृतीयपंथीयांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून त्यांना मंडळावर संधी देण्यात आली होती. मात्र, नियुक्तीनंतर अल्पावधीतच त्यांच्या निवडीवर विविध तृतीयपंथीय संघटनांकडून आक्षेप घेण्यात आले होते.

प्रतिनिधित्वाच्या निकषांबरोबरच काही वादग्रस्त हालचाली आणि राजकीय दबावाबाबत सरकारकडे तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली होती. त्यातच मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित संवेदनशील माहितीच्या आधारे दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. या घडामोडींनंतर सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत अखेर यादव यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला.

सामाजिक न्याय विभागाचे अवर सचिव विवेक शिंदे यांनी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. दरम्यान, पवन यादव यांच्याविरोधात मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहितीही समोर आली आहे.

मंत्री नरहरी झिरवाळ यांची कथित अश्लील चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पवन यादव यांचे भाऊ रवी यादव यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संबंधित व्हिडीओ पवन यादव यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचा दावा केला होता. तसेच काही राजकीय नेत्यांशी संबंधित व्हिडीओदेखील त्यांच्या मोबाईलमध्ये असल्याचे त्यांनी म्हटले होते. या वक्तव्यांनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon