कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात मध्यरात्री पोलिसांचे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’; ३३ जणांवर कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे यांच्या वतीने रविवारी मध्यरात्री विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. ही मोहीम पोलीस उपायुक्त परीमंडळ-३ अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या उपस्थितीत पार पडली.
११ मे २०२६ रोजी रात्री ११ ते पहाटे १२.३० दरम्यान कल्याण रेल्वे स्टेशन परिसर, एसटी बस स्थानक, झुंजारराव मार्केट, नीलम गल्ली तसेच विविध हॉटेल्स आणि लॉजेसमध्ये व्यापक तपासणी करण्यात आली.
या कारवाईदरम्यान सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणारे, अमली पदार्थांचे सेवन करणारे तसेच संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कठोर कारवाई केली. काही वारंगनांनाही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. पोलिसांनी मुंबई पोलीस कायदा, एनडीपीएस कायदा आणि मुंबई प्रोहिबिशन ॲक्ट अंतर्गत एकूण ३३ कारवाया नोंदवल्या. याशिवाय शहरातील चार लॉजेसची सखोल तपासणी करण्यात आली.
या विशेष मोहिमेत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच खडकपाडा पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे आणि कोळशेवाडी पोलीस ठाणे येथील तब्बल ३२ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. सीआरएम मोबाईल पथकांनीही कारवाईत सहभाग घेतला.
शहरातील गुन्हेगारी आणि अवैध प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.