‘मिसिंग लिंक’ नव्हे, ‘कनेक्टिंग लिंक’; मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला नवी आर्थिक गती : देवेंद्र फडणवीस
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा केवळ एक रस्ता नसून भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा जागतिक स्तरावरील उत्कृष्ट नमुना आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेला सुमारे ७० हजार कोटी रुपयांची चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ‘मिसिंग लिंक’ऐवजी ‘कनेक्टिंग लिंक’ हा शब्दप्रयोग अधिक संयुक्तिक असल्याचे सांगितले. या प्रकल्पातील अत्याधुनिक तांत्रिक बाबी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर त्यांनी विशेष प्रकाश टाकला.
दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेल्या कठीण भौगोलिक परिस्थितीत, जंगलातून यंत्रसामुग्री नेऊन हा प्रकल्प पूर्ण करणे मोठे आव्हान होते, असे नमूद करताना त्यांनी या कामात सहभागी सात देशांतील तज्ज्ञ संस्था आणि कंपन्यांचे आभार मानले. कामगार दिनाचे औचित्य साधत या प्रकल्पासाठी परिश्रम घेणाऱ्या कामगारांचे आणि एमएसआरडीसीच्या चमूचे त्यांनी कौतुक केले.
या ‘कनेक्टिंग लिंक’मुळे मुंबई–पुणे हा नॉलेज व टेक्नॉलॉजी कॉरिडॉर अधिक सक्षम होऊन राज्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विविध मंत्री, खासदार, वरिष्ठ अधिकारी आणि एमएसआरडीसीचे पदाधिकारी उपस्थित होते.