स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; जालना ते नंदूरबार, ठाणे ग्रामीण ते चंद्रपूरपर्यंत फेरबदल

स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; जालना ते नंदूरबार, ठाणे ग्रामीण ते चंद्रपूरपर्यंत फेरबदल

पोलीस महानगर नेटवर्क 

मुंबई : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या पूर्वसंध्येला गृह विभागाने पोलीस दलातील २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. या फेरबदलात जालना, अमरावती (ग्रामीण), नाशिक (ग्रामीण), अहिल्यानगर, परभणी, नंदूरबार, चंद्रपूर, ठाणे (ग्रामीण) आणि वाशिम या जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे. यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला.

या बदल्यांनुसार जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय के. बन्सल यांची सायबर सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे, तर अमरावती (ग्रामीण) येथील पोलीस अधीक्षक सिंगुरी विशाल आनंद यांची धुळे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक (ग्रामीण)चे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना मुंबई शहर पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्या जागी धोडोंपत एस. स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चंद्रपूरचे विद्यमान पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगर येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आयुष नोपानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोपानी सध्या जालना येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. याआधी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.

नंदूरबारच्या पोलीस अधीक्षकपदी अश्विनी सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर वाशिमच्या पोलीस अधीक्षकपदी निकेश खाटमोडे यांची नियुक्ती झाली आहे. परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, फोर्स वनचे पोलीस अधीक्षक गजानन राजमाने यांची मुंबई शहरात पोलीस उप आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच राज्य गुप्तवार्ता विभाग, नगरी हक्क संरक्षण विभाग आणि इतर महत्त्वाच्या पदांवरही बदल्या करण्यात आल्या आहेत.

या व्यापक फेरबदलामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलीस प्रशासनात नव्या जबाबदाऱ्यांची पुनर्रचना होणार असून, आगामी काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या नियुक्त्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon