केडीएमसीतील लिपिक ४० हजारांच्या लाचेप्रकरणी रंगेहात; फायर एनओसी साठी पैशांची मागणी
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) एका लिपिकाला ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. अग्निशमन विभागाकडील ‘ना हरकत दाखला’ (फायर एनओसी) मिळवून देण्यासाठी संबंधित लिपिकाने शाळा व्यवस्थापनाकडे लाचेची मागणी केल्याची प्राथमिक माहिती आहे.
तक्रारदार शाळा प्रशासनाने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार, गुरुवारी ४० हजार रुपये स्वीकारताना संबंधित लिपिकाला पकडण्यात आले. भरत पाटोळे असे या कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती प्राथमिक स्वरूपात समोर येत आहे.
दरम्यान, ही कारवाई प्राथमिक टप्प्यात असून एसीबीकडून अधिकृत प्रसिद्धिपत्रक जारी झाल्यानंतर घटनेचे तपशील स्पष्ट होणार आहेत. या प्रकरणामुळे केडीएमसीतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.