बुडालेली गाडी परत देण्यासाठी ५० हजारांची लाच; कोल्हापुरातील पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

बुडालेली गाडी परत देण्यासाठी ५० हजारांची लाच; कोल्हापुरातील पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

कोल्हापूर : भुदरगड पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराला बुडालेली गाडी परत मिळवून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. या कारवाईत संबंधित हवालदारासह त्याच्या पंटरलाही ताब्यात घेण्यात आले असून या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी सुभाष चौगले हा भुदरगड पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत होता. त्याच्यासोबत मुस्ताक शेख यालाही अटक करण्यात आली आहे. चौगले याने तक्रारदाराकडून ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची गाडी मौनी सागर जलाशयात बुडाली होती. ही गाडी परत मिळवण्यासाठी त्यांनी पोलिसांकडे मदतीची मागणी केली होती. मात्र, मदत करण्याऐवजी गाडी परत देण्याच्या मोबदल्यात चौगले याने थेट ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुप्तपणे पडताळणी केली असता लाचेची मागणी स्पष्ट झाली. त्यानंतर रात्री उशिरा सापळा रचण्यात आला.

ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने झडप घालत चौगले आणि त्याचा साथीदार मुस्ताक शेख यांना रंगेहात पकडले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला असून, नागरिकांना मदत करण्याऐवजी लाच मागितल्याने संताप व्यक्त होत आहे. ‘रक्षणकर्ता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिसांकडूनच अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असल्याने प्रशासनातील उत्तरदायित्वावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon