कॅनरा बँकेत ७.३१ कोटींच्या सोन्याचा अपहार; शाखा व्यवस्थापक, गोल्ड व्हॅल्यूअर अटकेत

कॅनरा बँकेत ७.३१ कोटींच्या सोन्याचा अपहार; शाखा व्यवस्थापक, गोल्ड व्हॅल्यूअर अटकेत

पोलीस महानगर नेटवर्क

जालना : बदनापूर येथील कॅनरा बँकेच्या शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या कर्जप्रकरणात तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांच्या सोन्याचा अपहार आणि फसवणूक उघडकीस आली आहे. या प्रकरणात शाखाधिकारी विजयेंद्र पाटणकर, सुवर्ण मूल्यमापक (गोल्ड व्हॅल्यूअर) प्रवीण बुऱ्हाडे यांना पोलिसांनी अटक केली असून, बँक अधिकारी संजय डोंगरे हा फरारी आहे. न्यायालयाने अटक आरोपींना २७ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बँकेच्या सोनेतारण कर्ज व्यवहारांची तपासणी करण्यासाठी बुधवारी (२२ एप्रिल) बँकेचे सहायक महाव्यवस्थापक बी. व्ही. केशवमूर्ती बदनापूर शाखेत आले असता हा प्रकार समोर आला. तपासणीत २२ कर्जप्रकरणांतील ३ कोटी ७९ लाख रुपयांचे तारण ठेवलेले सोन्याचे दागिने व वस्तू बनावट असल्याचे आढळले.

याशिवाय, बँकेच्या मुख्य तिजोरीत ठेवलेली सोनेतारण कर्जाशी संबंधित ३० पाकिटे, ज्यांची किंमत सुमारे ३ कोटी ५२ लाख रुपये आहे, ती गायब असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे एकूण अपहाराची रक्कम ७ कोटी ३१ लाख रुपयांपर्यंत पोहोचली.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता बँकेचा अधिकारी संजय डोंगरे याने तिजोरीतून सोनेतारण कर्जातील सोन्याची पाकिटे चोरल्याचे स्पष्ट दिसून आले. या प्रकारात शाखा व्यवस्थापक विजयेंद्र पाटणकर यांचा सहभाग असल्याचेही तपासात समोर आले.

तसेच, सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुऱ्हाडे याने २२ कर्जप्रकरणांत बनावट सोने खरे असल्याचे प्रमाणित करून दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे फसवणुकीचा हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon