कार्यस्थळी सुरक्षिततेसाठी पोलीस आयुक्तालयात POSH जनजागृती सत्र
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई : कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात जागरूकता वाढविण्यासाठी पोलीस आयुक्तालय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आंतरिक तक्रार समिती (ICC) आणि ‘विशाखा’ मार्गदर्शक तत्त्वे अर्थात POSH कायद्याविषयी संवादात्मक जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले.
या सत्राचे आयोजन पोलीस उपायुक्त सौ. मीना मकवाना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कॉज फाउंडेशनच्या संचालिका सौ. कल्पना मोरे, संचालक श्री. जितेश मोरे तसेच अॅड. संध्या जाधव यांनी POSH कायद्याच्या तरतुदींवर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यस्थळी लैंगिक छळाची व्याख्या, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, आंतरिक तक्रार समितीची भूमिका आणि महिलांच्या सुरक्षिततेसंबंधी आवश्यक बाबी याबाबत त्यांनी माहिती दिली.
सत्रादरम्यान प्रत्यक्ष उदाहरणे आणि चर्चेच्या माध्यमातून विषय अधिक प्रभावीपणे मांडण्यात आला. अधिकारी व कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न उपस्थित केले.
सुरक्षित, सन्मानजनक आणि विश्वासपूर्ण कार्यस्थळ निर्मितीसाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे ठरत असून, या सत्रातून POSH कायद्याविषयीची समज अधिक दृढ झाल्याचे सहभागींकडून सांगण्यात आले.