रिक्षा परवान्यांसाठी बोगस जन्मदाखले; एकाच दाखल्यावर सहा जणांची नोंदणी उघड

रिक्षा परवान्यांसाठी बोगस जन्मदाखले; एकाच दाखल्यावर सहा जणांची नोंदणी उघड

भाईंदर : रिक्षा परवाने मिळवण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेचे बोगस जन्मदाखले तयार करून त्यांचा वापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, एकाच जन्मदाखल्यावर सहा जणांनी नोंदणी केल्याचे माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.

मिरा-भाईंदर शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे रिक्षा परवाने दिल्याची तक्रार भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व रिक्षा परवान्यांची पुनर्तपासणी करण्याचे आदेश उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय स्वरूपही प्राप्त झाले आहे.

दरम्यान, तपासणी सुरू असताना अद्याप एकही बोगस परवाना आढळला नसल्याचा दावा उप-प्रादेशिक परिवहन विभागाने केला आहे. परवाने देताना शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती तसेच पोलिसांच्या ‘ना हरकत’ दाखल्याच्या आधारेच प्रक्रिया केली जाते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

रिक्षा संघटनेचे पदाधिकारी निलेश फफाळे यांनी माहितीच्या अधिकारातून परवानाधारकांची कागदपत्रे मिळवून त्यांची छाननी केली असता, काही अर्जदारांनी बोगस कागदपत्रे सादर केल्याचे उघड झाले. या प्रकरणात मिरा-भाईंदर, ठाणे आणि जालना महापालिकांच्या बनावट जन्मदाखल्यांचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. एकाच नोंदणी क्रमांकाचा वापर करून नाव बदलत बनावट दाखले तयार करण्यात आले असून, एकाच दाखल्यावर सहा जणांची नोंदणी झाल्याची बाब विशेष धक्कादायक आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागानेही कागदपत्रांची सखोल तपासणी करून आवश्यक ती तक्रार दाखल केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon