ठाण्याचा ‘कॅसिनो बाबा’ निघाला कॅप्टन खरातचाही ‘बाप’; अनेकांना काळ्या जादूची भीती दाखवून कोट्यवधींचा गंडा
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – नाशिकच्या भोंदू अशोक खरातने महिलांचे शोषण केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच, आता ठाण्यातून फसवणुकीचा एक अजब प्रकार समोर आला आहे. स्वत:ला ‘दिक्षित बाबा’ म्हणवून घेणाऱ्या मंजूनाथ शेट्टी याने अनेकांना काळ्या जादूची भीती दाखवून कोट्यवधींचा गंडा घातला आहे. विशेष म्हणजे, अघोरी पूजेच्या नावाखाली लुटलेले हे पैसे हा बाबा गोव्यातील कॅसिनोमध्ये उडवत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
मंजूनाथ शेट्टी ऊर्फ दिक्षित बाबा हा प्रामुख्याने श्रीमंत लोकांना आपले लक्ष्य बनवत असे. “तुमच्यावर कोणीतरी काळी जादू केली आहे”, “तुम्ही लवकरच मरणार आहात” किंवा “अघोरी पूजा केल्यास तुम्हाला अमाप धनदौलत मिळेल”, असे सांगून तो लोकांना जाळ्यात ओढायचा. मुलंबाळं होत नसलेल्या जोडप्यांनाही तो पूजेचे आमिष दाखवून लुबाडायचा. पूजेच्या नावाखाली चांगलीच रक्कम हा बाबा उकळत असे.
दिक्षित बाबाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तो अघोरी पूजा करण्यासाठी पीडितांना घेऊन गोव्याला जायचा. मात्र, तिथे गेल्यावर तो कोणतीही पूजा न करता पीडितांकडून घेतलेले पैसे गोव्यातील पंचतारांकित हॉटेल्स आणि कसिनोमध्ये उडवायचा. एका रात्रीत तब्बल १४ लाख रुपयांचे बिल त्याने एका कसिनोत भरल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्या या ‘हाय-प्रोफाईल’ जीवनशैलीमुळे त्याला आता ‘कसिनो बाबा’ हे नाव पडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भोंदू बाबा विमानाने प्रवास करायचा आणि गोव्यातील आलिशान हॉटेल्समध्ये राहायचा. त्याच्यासोबत रशियन आणि कझाकिस्तानमधील महिलांचा वावर असायचा. या बाबाला जेव्हा पोलिसांनी तपासासाठी गोव्यातील त्याच कसिनोमध्ये नेले, तेव्हा तिथले कर्मचारीही त्याचा हा अवतार पाहून अवाक झाले.
या प्रकरणात गोव्यातील एका कसिनो मॅनेजरचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. बाबाच्या बँक खात्यात अनेकांनी लाखो-कोट्यवधी रुपये पाठवल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. या रॅकेटमध्ये अजून किती जण सामील आहेत, याचा शोध ठाणे पोलीस घेत आहेत.