नवी मुंबईतील पनवेल रेल्वे स्थानकावर एक मोठा अनर्थ टळला; सोमवारी साकाळी लिफ्ट कोसळल्याने मोठा खोळंबा,सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका
योगेश पांडे / वार्ताहर
नवी मुंबई – सोमवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी पनवेल रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली. लिफ्टमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांसह ही लिफ्ट अचानाक मध्येच बंद पडली. यावेळी लिफ्टमध्ये ४ प्रवासी अडकल्यामुळे सोमवारी सकाळी पनवेल रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. लिफ्टच्या देखभालीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याचे आरोप केले जात आहेत.
वर्दळीच्या पनवेल रेल्वे स्थानकावर सकाळच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरील लिफ्ट अचानक कोसळल्याने चार प्रवासी आत अडकले. सुदैवाने तत्पर बचावकार्यामुळे सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले, मात्र या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही लिफ्ट वरून खाली येत असताना अचानक बिघाड होऊन कोसळली. त्या वेळी लिफ्टमध्ये चार प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य युद्धपातळीवर राबवण्यात आले आणि केवळ १० मिनिटांत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली.
पनवेल स्थानक हे लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल व मेमू ट्रेनमुळे नेहमीच गजबजलेले असते. विशेषतः आठवड्याच्या सुरुवातीला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा ठिकाणी लिफ्टसारख्या सुविधेची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असतानाही देखभालीतील त्रुटी उघड झाल्याचे दिसून येते. यापूर्वीही मुंबई व उपनगरांत लिफ्ट कोसळण्याच्या घटना घडल्या असून काहींना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. तरीही अनेक ठिकाणी लिफ्टची नियमित तपासणी व देखभाल होत नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
हार्बर रेल्वे मार्गावर जानेवारी महिन्यात सुरू झालेल्या एसी लोकलमुळे आधीच प्रवाशांचा सकाळी खोळंबा होतो. सकाळी ९ च्या दरम्यान निघणारी एसी लोकल नेहमी विलंबाने सुटत असल्यामुळे पुढील साधारण लोकलचं वेळापत्रक कोलमडतं आणि स्थानकावर नेहमी गर्दी होते. त्यात आता सुरू झालेल्या अमृत भारतमुळेही प्रवाशांची गर्दी वाढली आहे. सोमवारी सुटणाऱ्या या ट्रेनमुळे पनवेल स्थानकावर लोकल, मेमू आणि अमृत भारतमुळे स्थानकावर अनेकदा चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण होते. त्यात अशा दुर्घटनांमुळे प्रवाशांना आणखी समस्यांना सामोरे जावे लागत आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. तांत्रिक बिघाड की निष्काळजीपणा, याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे स्थानकांवरील लिफ्ट व इतर सुविधांची नियमित तपासणी आणि कडक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.