२ महिने पोलिसांना चकवा देणाऱ्या मुंबईच्या ड्रग्ज क्वीनचा गेमओव्हर; टिटवाळा येथून ५ कोटी ७ लाख रुपयांच्या एमडी ड्रग्ससह ३५ वर्षीय महिला तस्कराला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईत ड्रग्जचा काळाबाजार करून गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या एका ३५ वर्षीय महिला तस्कराला अखेर टिटवाळ्यातून अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महिलेच्या घरातून मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तब्बल ५ कोटी ७ लाख रुपये किंमतीच्या एक्स्टेसी (एमडी) गोळ्या जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे टिटवाळा आणि कल्याण ग्रामीण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ एप्रिलला मुंबईत झालेल्या एका मोठ्या ड्रग्ज कारवाईत या महिलेचे नाव मुख्य सप्लायर म्हणून समोर आले होते. तेव्हापासून ही महिला मुंबईतून फरार झाली होती. अटक टाळण्यासाठी तिने टिटवाळा गाठले. यानंतर तिने टिटवाळ्यातील पद्मावती सोसायटीमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला. यावेळी तिने आपण एक साधी गृहिणी असल्याचे सर्वांना भासवले. गेल्या दोन महिन्यांपासून ती तिथे राहत होती. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे घाटकोपर एएनसीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचला. यानंतर त्यांनी मध्यरात्री घराची झडती घेतली.
अमली पदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर युनिटने टिटवाळा येथील पद्मावती सोसायटीमध्ये छापा टाकला असता पोलिसांना मोठा धक्का बसला. या घराच्या झडतीमध्ये ४,०५६ एमडी (एक्स्टेसी) गोळ्या सापडल्या, ज्याचे एकूण वजन २ किलो ३०० ग्रॅम इतके आहे. या गोळ्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ५ कोटी ७ लाख रुपये आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर साठा सापडल्याने हे एखादे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
वरिष्ट पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. प्राथमिक चौकशीत ही महिला केवळ सप्लायर नसून, मुंबईतील एका मोठ्या ड्रग्ज टोळीचे संचालन करत असल्याचे समोर आले आहे. ही महिला मूळची नवी मुंबईची असून तिच्या संपर्कात असणारे इतर साथीदार कोण आहेत, हे अंमली पदार्थ कुठून आले आणि कोणाला विकले जाणार होते, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. सध्या पोलिसांनी तपासाच्या गोपनीयतेसाठी या ड्रग्ज क्वीनचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र लवकरच या प्रकरणातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.