नाशिकमध्ये खाजगी कंपनीतील धक्कादायक प्रकरण समोर; ८ महिलांचा विनयभंग आणि अत्याचार, तब्बल ९ गुन्हे दाखल

Spread the love

नाशिकमध्ये खाजगी कंपनीतील धक्कादायक प्रकरण समोर; ८ महिलांचा विनयभंग आणि अत्याचार, तब्बल ९ गुन्हे दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

नाशिक – भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजे असताना आता नाशिकमधील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखावल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवत ६ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीत कार्यरत असलेल्या काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून महिलांचा गेल्या काही २ वर्षांपासून मानसिक आणि लैंगिक छळ सुरू होता. अखेर पीडित महिलांनी तक्रार केल्यानंतर या प्रकाराची भीषणता समोर आली आहे. प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून नाशिक शहर पोलीस आयुक्तांनी या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने सर्व खाजगी आस्थापनांना सदर ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कडक निर्देश दिले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना कोणताही त्रास होत असल्यास त्यांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन देखील शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे. ज्यासाठी अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक ९९२३३२३३११ वर मेसेज पाठवू शकतात किंवा आपत्कालीन परिस्थितीत ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे.

एकूण ८ पीडित महिला यांनी या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. तर एका पुरुषाने देखील दिलेल्या तक्रारीहून १ गुन्हा असे एकूण ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शब्बीर शेख, शफी शेख, रजा मेमन, आसिफ अन्सारी, शाहरुख कुरेशी, तौसीफ अत्तार असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपी यांचे नाव आहेत. आठ दिवसांपूर्वी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांनतर आज दुसऱ्या गुन्ह्या संदर्भात ५ संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने या प्रकरणी २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सरकारी वकिलांकडून बुधवारी सुनावणी दरम्यान युक्तीवाद करण्यात आला की, या प्रकरणाचा आणखी तपास करणे बाकी असून, आणखी काही महिलांच्या तक्रारी पुढे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आरोपींच्या वकिलांनी “या सगळ्या प्रकरणाचा तपास झाला आहे. महिलांनी इतक्या महिन्यानंतर तक्रार का दाखल केल्या? अधिकची पोलिस कोठडीची गरज नाही”, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने या प्रकरणी आरोपींना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या प्रकरणात आता शहर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार विशेष एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या अध्यक्षतेखाली या एसआयटी ची स्थापना करण्यात आली आहे. पुढे तपासात काय-काय बाबी समोर येतात हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon