कल्याण-डोंबिवलीत अतिक्रमणावरून संताप; आयुक्तांच्या प्रतिकात्मक फोटोला ‘शेण खाऊ’ आंदोलन

Spread the love

कल्याण-डोंबिवलीत अतिक्रमणावरून संताप; आयुक्तांच्या प्रतिकात्मक फोटोला ‘शेण खाऊ’ आंदोलन

योगेश पांडे / वार्ताहर

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका (केडीएमसी) हद्दीतील द्वारलीपाडा परिसरात शासनाच्या आरक्षित जागेवर झालेल्या कथित अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या प्रतिकात्मक फोटोला शेण लावून ‘शेण खाऊ’ आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरचरणची सुमारे तीन एकर आरक्षित जागा असताना त्या जागेवर भूमाफियांनी अतिक्रमण करून चाळ उभारल्याचा आरोप करण्यात येत आहे. या ठिकाणी जवळपास ९० घरे बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. शासनाच्या मालकीच्या जागेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम होऊनही महापालिकेला याची माहिती नव्हती का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या प्रकरणात अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. सौरव सिंह, सौरभ पांडे आणि विनोद तिवारी यांनी महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचे सांगितले. ४ जानेवारीपासून ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत असून, काही दिवसांपूर्वी त्यांनी आंदोलनही केले होते.

तथापि, प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी प्रभाग कार्यालयासमोर प्रतिकात्मक आंदोलन करत आयुक्तांच्या फोटोचे पूजन करून त्यास शेण लावले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दरम्यान, केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती देत, पुढील कारवाई केली जाईल असे सांगितले.

मात्र, तक्रारीनंतरच कारवाई का, असा प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon