‘सीबीआय अधिकारी’ बनून ७१ लाखांची फसवणूक; डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली : स्वतःला केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून दोन अज्ञात संशयितांनी येथील रहिवासी महेश आगरकर यांची तब्बल ७१ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून सायबर गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयितांनी आगरकर यांना फोन करून त्यांच्या बँक व्यवहारात गैरप्रकार झाल्याचे सांगत भीतीचे वातावरण निर्माण केले. तसेच या कथित गैरप्रकारातून सुटका करण्यासाठी ठराविक रक्कम भरणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. भीतीच्या भरात आगरकर यांनी विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने ७१ लाख १० हजार रुपये वर्ग केले.
फसवणूक अधिक विश्वासार्ह वाटावी यासाठी संशयितांनी बनावट ‘सुप्रीम कोर्ट’ संबंधित कागदपत्रेही आगरकर यांना पाठवली. पैसे भरल्यानंतर रक्कम परत मिळेल, अशीही खोटी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, नंतर कागदपत्रांची शहानिशा केली असता ती पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आगरकर यांनी टिळकनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून सायबर गुन्हे शाखाही या प्रकरणाचा समांतर तपास करत आहे.
दरम्यान, कोणतीही सरकारी यंत्रणा किंवा तपास यंत्रणा फोनद्वारे पैसे मागत नाही. अशा प्रकारचे फोन, संदेश किंवा कागदपत्रे मिळाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.