नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर; ८७६ कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी

Spread the love

नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर; ८७६ कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी

योगेश पांडे / वार्ताहर

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ८७६ कोटींच्या मालमत्ता कराची विक्रमी वसुली करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून एका आर्थिक वर्षात वसूल केलेला हा सर्वात जास्त मालमत्ता कर आहे. विशेष म्हणजे एमएमआरडीए विभागात असलेल्या इतर महानगरपालिकां पेक्षाही नवी मुंबई महानगरपालिका करवसुलीत अग्रेसर आहे. लागू करण्यात आलेली अभय योजना आणि महापालिकेच्या नियोजनबद्ध वसुली मोहिमेमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे.

कर वसुली प्रक्रियेत पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर आणि नागरिकांपर्यंत पोहोचणारी कार्यपद्धती यावर महानगरपालिकेने विशेष भर दिला होता. ऑनलाईन पेमेंट प्रणाली तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने जमा झालेल्या ८७६ कोटी मधील ६० टक्के रक्कम ही करदात्यांनी ॲानलाईन पद्धतीने भरलेली आहे. कर भरण्याबाबत एसएमएस, नोटीस, व्हॉट्सअप मेसेज व प्रत्यक्ष भेटीद्वारे नियमित पाठपुरावा करण्यात आल्याने वसुलीच्या प्रक्रियेला गती मिळाली. साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील कर संकलन केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती.

नवी मुंबई महानगरपालिकेकडून १० मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकबाकीदारांना दिलासा देत कर भरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास संबंधित मालमत्ताधारकांना विलंब शास्तीवर ५० टक्के सवलत देण्यात आली होती. मालमत्ता कर विभागाने मालमत्ताधारकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या सर्व सुविधांमुळे यंदा नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता करामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ८७६ कोटींची वसुली करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon